आमच्याबद्दल
मिलाप थिएटर हे एक सर्जनशील व्यासपीठ आहे जिथे कथा थिएटर, चित्रपट, संगीत आणि लाईव्ह परफॉर्मन्सच्या माध्यमातून जिवंत होतात.
आमचे उद्दिष्ट
आमचे उद्दिष्ट असे कलात्मक अनुभव निर्माण करणे आहे जे लोकांना जोडतात, विचारांना चालना देतात आणि अर्थपूर्ण कथा सादर करतात.
प्रणव जोशी
प्रणव जोशी हे मराठी नाट्यविश्वातील एक महत्त्वाचे नाव आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा तिन्ही भूमिकांत त्यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सातत्यपूर्ण काम केले आहे. रंगभूमीशी त्यांचे नाते केवळ व्यावसायिक नसून ते पूर्णतः समर्पणाचे आहे, हे त्यांच्या आजवरच्या प्रवासातून स्पष्टपणे दिसून येते.
नाट्य क्षेत्रात प्रणव जोशी हे अनुभवी आणि पुरस्कारप्राप्त कलाकार म्हणून ओळखले जातात. एकांकिका, द्विमितीय आणि दीर्घांक नाटकांमधून अभिनय व दिग्दर्शन करत त्यांनी १०० हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. अभिनेता म्हणून ‘अश्रूंची झाली फुले’, ‘आबालाल अडकित्ते’ आणि ‘मुमताज महल’ यांसारख्या गाजलेल्या व्यावसायिक नाटकांतून त्यांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘द कॉन्शन्स’, ‘आय अग्री’, ‘ॲनिमल प्लॅनेट’ आणि ‘अल्पविराम’ ही त्यांची दिग्दर्शित नाटके आशय, मांडणी आणि प्रयोगशीलतेसाठी ओळखली जातात. याशिवाय ‘लेखकाचा कुत्रा’ हे प्रायोगिक नाटक अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत सादर करत त्यांनी रंगभूमीवर वेगळा ठसा उमटवला.
नाट्यप्रेमासाठी कॉर्पोरेट नोकरी सोडणारे प्रणव जोशी हे ‘मिलाप थिएटर टुगेदर’ या संस्थेचे संस्थापक असून या माध्यमातून त्यांनी मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीला नवे व्यासपीठ दिले आहे. या संस्थेने निर्मित केलेले ‘द क्लॅप’ हे चार्ली चॅप्लिन यांच्या जीवनावर आधारित मराठीतील पहिले कृष्णधवल नाटक विशेष उल्लेखनीय ठरले. ‘मिलाप’ संस्थेच्या माध्यमातून रंगभूमीशी संबंधित विविध उपक्रम, प्रयोग आणि नव्या कलाकारांना संधी देण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. सध्या ते ‘शेवग्याच्या शेंगा’ या लोकप्रिय नाटकाचे निर्माते असून या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रासह परदेशातही सुरू आहेत.
नाट्यविश्वासोबतच त्यांनी चित्रपट आणि डिजिटल माध्यमातही काम केले आहे. ‘पांडू’ आणि ‘धुरळा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रॉडक्शन विभागात योगदान दिले आहे. तसेच ‘शांती क्रांती’ आणि ‘सेफ जर्नीज’ या वेब सिरीजमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे. ‘पिच्चर प्लॅनेट’ या प्लॅटफॉर्मसाठी ते क्रिएटिंग प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अभिनेता संजय मिश्रा मुख्य भूमिकेत असलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘टर्टल’ या चित्रपटाशीही त्यांचा सहभाग राहिला आहे.